जळगाव मिरर | २८ जून २०२४
खान्देशात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत असतांना नुकतेच शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात विहीर धसून पती-पत्नीचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. काही क्षणात घडलेल्या या प्रकारामुळे दाम्पत्याला बचावाचाही वेळ मिळाला नाही. दरम्यान, या घटनेत दोनजण बालबाल बचावले आहे. रेबा पांगल्या पावरा (५०) व मीनाबाई रेबा पावरा (४५) असे पती-पत्नीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोयदा शिवारात रेबा पांगल्या पावरा हे पत्नी मीनाबाईसह राहत होते. गुरुवारी दुपारी १२ ते १२:३० वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीजवळ मोठा आवाज झाला. तेव्हा हे दाम्पत्य त्याठिकाणी धावत गेले. त्यावेळी विहिरीचा काही भाग धसू लागला होता, ते विहिरीजवळ उभे असताना त्यांच्या पायाखालील भागदेखील अचानक धसला. त्यात हे दोघे ढिगाऱ्याखाली दबले गेले.
