जळगाव मिरर / ११ एप्रिल २०२३ ।
राज्यात आता ठाकरे गट बाबरी मशीद पाडल्याचा मुद्दा घेत आक्रमक झाला असून याची मोठी चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये शिवसेनेचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं काहीही योगदान नव्हतं असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतचं म्हटलं होतं, त्याला आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही यावरुन त्यांनी निशाणा साधला. बाबरी पडली त्यावेळी पंतप्रधानांच नाव कुठेही नव्हतं, असं ठाकरेंनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले होते. एकही बाहेर यायला तयार नव्हता. अगदी त्यावेळी आपले माननीय पंतप्रधान बांगलादेशाच्या युद्धात म्हणजे त्या सत्याग्रहात सहभागी होते. पण बाबरीच्या आंदोलनात ते कदाचित हिमालयात असतील पण त्यांचं नाव कुठेही आलं नव्हतं” तेव्हाचे भाजपचे म्हणजेच भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी आपल्या अंगलट काहीही येऊ नये म्हणून जाहीर केलं होतं की, बाबरी पाडण्यात भाजप वैगरी कोणी नव्हतं, हे काम कोणी केलं असेल तर ते शिवसेनेनंच केलं असेल. ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी हजर होतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. बाबरी पाडल्याचं सांगायला मी बाळासाहेबांकडे गेले तेव्हा संजय राऊतांशी ते बोलत होते आणि म्हणाले की, “जर बाबरी शिवसेनैनिकानं पाडली असेल तर मला अभिमान आहे. त्यानंतर ते चिडले आणि म्हणाले कसलं हे नपुंसक हिंदुत्व आहे. एखाद्या कार्यकर्त्याला आपण सांगायचं आणि घटना घडल्यानंतर पळून जायचं असं नेतृत्व असेल तर या देशात हिंदू कधी उभं राहू शकणार नाही”
आता हे सगळेजण हळूहळू बिळातून बाहेर येत आहेत. कोण म्हणतं मी या तुरुंगात होतो त्या तुरुंगात होतो. मग इतकी वर्षे का गप्प होतात, असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. मोगलांचा इतिहास पुसता पुसता हे हिंदूंचा देखील इतिहास पुसत आहेत. बाबरी पडल्यानंतर मुंबईत शिवसेना सत्तेत नव्हती तेव्हा शिवसैनिकांनी मुंबई वाचवली, असा दावाही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.
