जळगाव मिरर | २ जुलै २०२५
राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासात आज भाजप नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणी त्यांनी नाला रुंदीकरणाच्या मुद्यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या उत्तरावर थेट विधानसभा अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली. मंत्री दादा कोंडकेंसारखे उत्तर देत आहेत, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची विधिमंडळ परिसरात खमंग चर्चा सुरू होती.
नाल्यांच्या योग्य नियोजनाअभावी नाल्यांशेजारी राहणाऱ्या वस्त्यांना फटका बसतो. नाल्यांची संरक्षक भिंत नियमांनुसार बांधली जात नाही. या प्रकरणी पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला तर सरकार त्या अभियंत्यावर कारवाई करणार का? याशिवाय जिथे – जिथे नाले असतील त्यांच्या दुरुस्तीविषयी सरकारचे नियोजन काय? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला केला. त्याला उत्तर देताना मंत्री संजय राठोड म्हणाले, सरकार अशा नाल्यांचे सर्वेक्षण करेल. नाल्यांची रुंदी तपासून ती वाढवावी लागेल का ते पाहील. भूमीअभिलेख विभागाकरवी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशी करेल. तसेच उर्वरित नाल्यांचे बांधकाम करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवू.
मंत्री संजय राठोड यांचे हे उत्तर ऐकून सुधीर मुनगंटीवार यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले, नाल्याची नैसर्गिक रुंदी जेवढी आहे तेवढीच राहिली पाहिजे. सरकार याची खबरदारी घेणार आहे का? त्यावर मंत्री राठोड केवळ सजेशन फॉर अॅक्शन (यावर विचार करू किंवा सल्ला ऐकला असून, त्यावर कार्यवाही करू) असे त्रोटक उत्तर दिले. त्यावर मुनगंटीवर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
हे काय दादा कोंडकेंचे उत्तर आहे का?
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मंत्री संजय राठोड आमचे मित्र आहेत. पण नाल्यांची नैसर्गिक रुंदी कायम राहील का? असा माझा प्रश्न होता. त्यांनी सजेशन फॉर ॲक्शन एवढेच उत्तर दिले. हे ॲक्शन, ओन्ली ॲक्शन, नो रिॲक्शन असे असले पाहिजे. मंत्र्यांकडून अपेक्षित आहे की, नाल्याची नैसर्गिक रुंदी काय राहिली पाहिजे. त्यांच्याकडून हमी यायला हवी की नाल्याची नैसर्गिक रुंदी तशीच ठेवली जाईल. ती हमी न देता सजेशन फॉर अॅक्शन हे काय उत्तर आहे का? हे तर द्विअर्थी उत्तर झाले. हे काय दादा कोंडकेंचे उत्तर आहे का? हे द्विअर्थी आहे का? त्याऐवजी नाल्याची रुंदी निश्चित राहील याची हमी द्या.
सुधीर मुनगंटीवार यांच्या या नाराजीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री संजय राठोड यांना मुनगंटीवार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपाययोजना करण्याची सूचना केली. उल्लेखनीय बाब म्हणजे सुधीर मुनगंटीवार गत काही अधिवेशनांपासून सातत्याने आपल्याच सरकारच्या मंत्र्यांना धारेवर धरत असल्याचे चित्र आहे. सध्या ते राज्य मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा आहे.
