
जळगाव मिरर | ९ मार्च २०२६
बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुरुवातीला साधा रस्ता अपघात वाटणाऱ्या प्रकरणामागे प्रत्यक्षात थरारक कट असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे या घटनेत मृत्यू झालेल्या शिक्षिकेच्या हत्येचा कट तिच्याच पतीने रचल्याचा आरोप असून पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे.
मृत महिला वृषाली प्रकाश गावंडे या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या पिंपळगाव काळे येथील शाळेत नोकरी करत होत्या आणि रोजप्रमाणे स्कुटीवरून शाळेत ये-जा करत असत. २ मार्च रोजी सकाळी सुमारे साडेसहा वाजता त्या घरातून शाळेसाठी निघाल्या होत्या. दरम्यान, पातुर्डा ते कवठळ मार्गावर त्या स्कुटीवरून जात असताना एका पिकअप वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात वृषाली गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यावर मृतदेहाशेजारी त्यांचे पती प्रकाश गावंडे बसून रडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरुवातीला हा अपघात असल्याचेच सर्वांना वाटले. मात्र वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला. हा अपघात नसून घातपात असू शकतो, अशी शंका त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केली. यानंतर पोलिसांनी तपास अधिक गांभीर्याने हाती घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी सुरू केली. या तपासातून काही संशयास्पद बाबी समोर आल्या. त्यानुसार पोलिसांनी पिकअप वाहनाचा चालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान मंगेश सूर्यवंशी याने दिलेल्या कबुलीजबाबामुळे प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. त्याच्या म्हणण्यानुसार, प्रकाश गावंडे आणि त्यांचा मित्र मंगेश चहुळकर यांनी त्याला एक लाख रुपयांची सुपारी देऊन अपघात घडवून आणण्यास सांगितले होते. अपघातासारखा भासवून वृषाली गावंडे यांचा जीव घ्यायचा, अशी योजना आखण्यात आली होती. यानुसार २ मार्च रोजी सकाळी वृषाली गावंडे स्कुटीवरून शाळेत जात असताना पातुर्डा-कवठळ मार्गावर पिकअपने मुद्दाम धडक दिली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रकाश गावंडे, मंगेश चहुळकर आणि मंगेश सूर्यवंशी या तिघांना अटक केली. जळगाव जामोद पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पत्नीच्या हत्येसाठीच पतीने सुपारी दिल्याचा आरोप समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय होते, कौटुंबिक वाद की इतर काही कारण, याचा तपास पोलिसांकडून पुढे सुरू आहे.





















