
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील आहुजा नगर परिसरातील शिवधाम मंदिरासमोरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये पतीने पत्नीचा मोबाईल चॉर्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कविता जितेंद्र पाटील वय २० असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर जितेंद्र संजय पाटील वय २५ असे संशयित पतीचे नाव आहे. जितेंद्र हा पत्नीला गळफास दिल्यानंतर स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाल्याची ही माहिती मिळाली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, आहुजा नगर परिसरात ब्रह्मांडनायक अपार्टमेंट असून अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र संजय पाटील हा पत्नी कविता व दीड वर्षाची मुलगी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. जितेंद्र हा मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह भागवितो. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पती जितेंद्र याचा पत्नीसोबत वाद झाला. या वादातून जितेंद्र याने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने पत्नी कविता हिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती जितेंद्र हा स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. व त्यानेच पोलिसांना मी पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. तातडीने कविता हिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. घटनास्थळी तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे दाखल झाले होते व पुढील तपास करीत आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते.
अनैतिक संबंधाच्या संशयातून खून
संशयित आरोपी जितेंद्र याने पोलिसांनी माहिती दिली की, तो मूळ धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी आहे. त्याचं आणि कवितांचा दोन ते तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला आहे. लग्नानंतर पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबध जुळले होते. पत्नीला अनेकवेळेस समजावले. परंतू ती ऐकत नव्हती. मी गाव सोडून जळगावात आलो. परंतू तरी तो तरुण तिच्या संपर्कात होता. काही दिवसापूर्वी जळगावातील घरी देखील तो आला होता. पत्नीला समजावले. परंतू ती उलट मलाच आत्महत्या करण्याची धमकी देत होती. आजही तिला बोललो. पण पत्नी तशीच आत्महत्येची धमकी देत होती. त्यामुळे कंटाळून मी तिला गळफास दिल्याचे संशयित जितेंद्रने पोलिसांना सांगितल्याचे कळते. विशेष म्हणजे जितेंद्र आणि कविता प्रेम विवाह होता. या लव्ह स्टोरीचा भयानक शेवट झाल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक श्री. कुंभार यांनीही घटनास्थळी भेट माहिती जाणून घेतली.




















