जळगाव मिरर | संदीप महाले
एकीकडे गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा चोरी, हाणामारी, घरफोडी व खुनासारख्या गुन्ह्यातील संशयितांना अटकेची जोरदार मोहीम सुरु असताना दुसरीकडे मात्र जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. कुठल्याही अवैध धंद्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर ते अवैध धंदे पुन्हा जोरदार पद्धतीने सुरु होत असतात. यावर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी (एस.पी.)साहेब ‘सिंघम’च्या भूमिकेत येऊन जळगाव शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करणार का ? याकडे जळगाव शहरवासियांचे लक्ष लागून आहे.
जळगावात येतोय एम.डी.ड्रग्स ?
राज्यातील अनेक मोठ्या शहरात एम.डी.ड्रग्स आढळून येत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून जळगाव शहरात एम.डी.ड्रग्स आढळून येत असल्याने मोठी खळबळ उडत आहे, तर शहरात इतका मोठा अमली पदार्थ विकला जात असेल तर तरुणाई कुठल्या मार्गाने चाललीय? याकडे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे. यापूर्वी शहराचे आ.राजूमामा भोळे यांनी नियोजन बैठकीत या मुद्यावर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यावेळेस जर पोलीस यंत्रणेने लक्ष घातले असते तर जळगाव शहर पोलिसांना कारवाई करण्याची वेळ आली नसती. या आधीच एम.डी.ड्रग्सचे कनेक्शन समोर आले असते. या एम.डी.ड्रग्सवर विकणारा व त्याला माल पुरविणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोहचणार का ? यावर देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील सट्टा, पत्ता, जुगाराचे काय?
शहरातील अनेक मुख्य परिसरात हिरवा कापड लावून खुलेआम सट्टा, पत्ता व जुगाराचे भले मोठे अड्डे सुरु आहेत. यावर नेहमीच पोलीस यंत्रणा नाममात्र कारवाई करून पंटरांवर गुन्हे दाखल करते. मात्र मुख्य सूत्रधार फरार होण्यात नेहमीच यशस्वी होत असतो. त्यामुळे अवैध धंदे चालकांना चांगलेच फावत असते. यामागे कुणाचा वरदहस्त आहे? हे मात्र कधी समोर येत नाही. यावर जर सर्वसामान्य नागरिक पोलीस स्थानकात किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज केल्यास संबधीत अवैध धंदे चालकाचे काही पंटर संबंधित नागरिकाला धमकविण्यास देखील मागे पुढे बघत नाही. या धमकीवर मात्र कोणतीही कारवाई होत नाही, हे खेदाने नमूद करावे लागते.
अवैध वाळू चोरांचे काय ?
शहरालागून असलेल्या गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू मध्यरात्री आणून शहरातील प्रत्येक कानाकोपरऱ्यात शहरवासीयांना दिसत असते. वाळू चोरांनी गिरणा नदी चक्क बोडकी करून सोडली आहे. काही ठिकाणी शासकीय कार्यालय व पोलीस स्थानकानजीकच वाळू चोरटे मध्यरात्री वाळू टाकत असतात. तरी देखील महसूल व पोलीस यंत्रणेला याची खरंच माहिती नसेल का ? मात्र ही अवैध वाळू महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारींना कधी दिसणार? हा देखील संशोधनाचा भाग आहे. बरे विशेष म्हणजे जिल्ह्याला चार मंत्री लाभले आहेत.
पोलीस अधीक्षक साहेब ‘सिंघम’ची भूमिका घेणार ?
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी साहेब यांनी पदभार सांभाळल्यापासून आजवर झालेल्या चोरी, हाणामारी, दरोडे व खुनाच्या प्रत्येक गुन्ह्यातील संशयित आरोपींना पकडण्यात पोलीस अधीक्षक साहेबांना मोठे यश आले आहे. त्यांच्या या कामगिरी बद्दल त्यांचे कौतुक नक्कीच करावे लागेल, मात्र साहेब जळगाव शहरासह तालुक्यातील गुन्हेगारी व अवैध धंदे बंद करण्यासाठी तुम्हाला आता ‘सिंघम’ च्या भूमिकेत बघण्यासाठी जळगाव शहरवासीय आतुरतेने वाट बघत आहे.
(….पुढील भागात शहरातील पोलीस स्थाकाच्या हद्दीतील अवैध धंद्याची ‘पोलखोल’..)