जैन हिल्स येथे ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५ तांत्रिक सादरीकरण
जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२५
जैन हिल्स च्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) शेतकऱ्यांना लागवडीची दिशा ठरविण्याचा मंत्र मिळत आहे. जागतिक मानांकन असलेल्या बंदिस्त वातावरणात मातृवृक्षापासून तयार केलेल्या रोगमुक्त रोपांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण रोप लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी ते चांगले दिसत असले तरी पुढील पाच वर्षा नंतर त्यावर वेगवेगळे कीडरोगांचा प्रादुर्भाव दिसतो काही ठिकाणी तर ती फुलारा सुद्धा धरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत होऊन पाच वर्ष सांभाळल्यानंतर ती फळबाग काढून टाकणे कठिण होऊन जाते. असे असताना वैज्ञानिक दृष्टिकोन परिषदेच्या माध्यमातून संशोधकांनी दिला जात आहे. गेल्या दशकांमध्ये जैन स्वीट ऑरेजच्या माध्यमातून जैन इरिगेशनसारखी खासगी संस्था प्रभावी संशोधन करीत आहे ते शेतकऱ्यांसाठी मौलीक अशी गोष्ट आहे. असे सांगत कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना चांगल्यात चांगली रोपे उपलब्ध करुन द्यावी असे मत परभणी मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी व्यक्त केले.
देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) तांत्रिक सादरीकरणाच्यावेळी डॉ. अशोक धवन बोलत होते. बडिहांडा सभागृह आणि परिश्रम सभागृहात ‘तांत्रिक सत्र’ संपन्न झाले. याच परिषदेचा एक भाग म्हणून जैन संशोधन प्रात्यक्षिक केंद्रातील जैन स्वीट ऑरेंज च्या मातृवृक्ष ग्रीन हाऊस, मोसंबी लागवड क्षेत्र तसेच फळ प्रक्रिया उद्योग यासह क्लायमेंट स्मार्ट टेक्नॉलॉजीची प्रात्यक्षिके सर्व अभ्यासकांनी अनुभवली.
त्यात लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी करावयाच्या बाबींवरील संशोधन पेपर्स सादर करण्यात आले त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. डॉ. येलेश कुमार यांनी उत्पादन वाढीसाठी रोपांची गुणवत्ता यावर सादरीकरण केले. नागपूरचे डी. टी. मेश्राम यांनी पिक निहाय पाण्याचे नियोजन, सेंन्सर सिस्टीम्, सरफेस इरिगेशनसह ऑटोमेशनचा वापर यातून पिकांची वाढ, ताण, फुलोरा आणि फळांची गुणवत्ता यावर सादरीकरणातून भाष्य केले. जैन इरिगेशनचे एम. एस. लधानिया यांनी रूट एअर प्रुनिंग, क्लायमेंट चेंज टेक्नोलॉजीवर सादरीकरण केले. त्यात त्यांनी जैन स्वीट ऑरेंज च्या विविध वाणांची माहिती दिली. मल्लिकार्जून बिरादार यांनी जैव उत्तेजक आणि सुक्ष्मपोषक घटकांच्या वापरातून लिंबूवर्गीय फळधारणा सांगितले. जैन इरिगेशनचे जगदीश पाटील यांनी जैन स्वीट ऑरेंजची सेंद्रीय पद्धतीने लागवड, आकाश शर्मा यांनी गोड संत्र्यांसाठी अनावश्यक वाढ होणाऱ्या फांद्यांची छाटणीवर सांगितले. लिंबूवर्गीय फळांच्या झाडांना ताणाखाली ठेवण्यासाठी मुळांच्या आकारात्मक पाण्याचे व्यवस्थापन यावर विश्वजित सिंग यांनी सादरीकरण केले. हायटेक ग्रीन हाऊस नर्सरी अंतर्गत लिंबूवर्गीय मायक्रोबडेड यावर जैन इरिगेशनचे डी.जी.पाटील यांनी वस्तूनिष्ठ सादरीकरण केले.
उत्पादन वाढीचे सोल्यूशन म्हणजे मातृवृक्ष – डॉ. अवी सडका
सध्या नर्सरी कायद्यांमध्ये खूप कठोरता आली आहे. जागतिक स्तरावर ती काटेकोरपणे पाळली जात आहे. चुकीच्या पद्धतीने ग्राफ्टिंग करुन रोपं विकून शेतकऱ्यांची फसवणूकीचे प्रकार अनेक ठिकाणी घडली आहे. बंदिस्त गृहामधील मातृवृक्षापासून तयार झालेल्या रोपांच्या संत्र्यांचे उत्पादन वाढू शकते. जेणेकरुन त्यावर व्हायरस येणार नाही. माती विरहीत मिडीया पासून तयार झालेली रोपं ही प्रमाणीत लॅबोरेटिमध्ये टेस्टींग झाली असतात. जैन हिल्सवर बघितलेली हायटेक प्लॉट फॅक्टरी ही गुणवत्तापूर्ण रोप निर्माण करत असून ते शेतकऱ्यांसाठी वन स्टॉफ सोल्यूशन ठरू शकते असे मत इस्त्राईलचे शास्त्रज्ञ डॉ. अवी सडका यांनी व्यक्त केले.
“सिट्रस पिकांवरील कीड व रोगांचे निदान, निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी नवोन्मेषी रणनीती.” हे सत्र परिश्रम सभागृहात झाले. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. एन. के. कृष्णकुमार यांनी भूषविले, तर सहअध्यक्ष म्हणून डॉ. एम. कृष्णा रेड्डी, डॉ. संदीप सिंग होते. सत्राचे समन्वयक म्हणून डॉ. वाय. व्ही. इंगळे, डॉ. आशिष वारघणे यांनी काम पाहिले. ब्राझीलमधील सिट्रस उद्योगासाठी गंभीर ठरत असलेल्या हुआंगलॉन्गबिंग (HLB) रोगावरील स्थिती, त्याचा प्रसार, परिणाम आणि व्यवस्थापन उपाय यावर अलेसिओ एस. मोरेरा यांनी सादरीकरण केले. डॉ. एम. कृष्णा रेड्डी यांनी रोगमुक्त सिट्रस लागवड साहित्य निर्मिती प्रणालीवर सविस्तर मार्गदर्शन केले. पंजाबमधील लिंबूवर्गीय फळांवरील (Citrus) ‘फळ पोखरणारी पतंग’ या विषयावर पंजाब कृषी विद्यापीठाच्या फळ विज्ञान विभागाचे तज्ज्ञ डॉ. संदीप सिंग यांनी सादरीकरण केले. आर. येम. गाडे यांनी फायटोफ्थोरा हा जमिनीत राहणारा बुरशीसदृश सूक्ष्मजीव या मुळे होणारे प्रमुख रोग खोडकुज, डायबॅक यांच्याबाबत सविस्तर विषयाची मांडणी केली. या श्रुंखलेत ए. के. दास यांनी देखील आपल्या विषयाची मांडणी केली, भारतीय लिंबूवर्गीय फळबागांना HLB (Huanglongbing) किंवा ग्रीनिंग रोग हा संत्रा, मोसंबी व लिंबूवर्गीय फळबागांमधील सर्वात धोकादायक व विनाशकारी रोग असून त्याची लक्षणे व उपाययोजना याबाबत सांगितले.
जैविक कीटकनाशके (बायोपेस्टिसाइड्स) हे शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे साधन आहे. रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक पर्यायांचा अवलंब करण्यावर भर देताना, भारताने ब्राझीलसारख्या देशांच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करावा आणि स्थानिक गरजेनुसार उपाय विकसित करावेत, असे संजीव कुमार यांनी सादरीकरण केले. ड्रोन इमेजिंग आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने लिंबूवर्गीय फळांवरील ‘HLB’ रोगाचे अचूक निदान; संशोधनात या आधुनिक तंत्राचा चपखल वापर कसा करावा या बाबत डॉ. विशाल काळबांडे यांनी सविस्तर सांगितले.
संपूर्ण भारतातील लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन
परिषदेच्या उद्घाटन स्थळी संपूर्ण भारतातील व महाराष्ट्रातील लिंबूवर्गीय फळे तसेच जैन इरिगेशनने विकसीत केलेल्या ३४ वाणांची मांडणी या ठिकाणी केली होती. यात लिंबू, संत्रे, मोसंबी, किनो, ग्रेपफ्रुट भारतातील असंख्य लिंबूवर्गिय प्रजाती पैकी मुख्य व प्रचलीत असलेल्या ४४ वाणांचा या प्रदर्शनासाठी समावेश करण्यात आला होता. या शिवाय जैन इरिगेशनने विकसीत केलेल्या ‘जैन मॅडरिन – १’ व ‘जैन स्वीट ऑरेंज-६’ या दोन वाणांसह रोपे व कलमांची मांडणी देखील या लिंबू वर्गिय फळांच्या प्रदर्शनात होती. एकाच छताखाली इतक्या व्हरायटी अभ्यासकांना बघण्याची संधी जैन हिल्स येथे उपलब्ध करण्यात आली होती.
अभ्यासकांचे संशोधन पेपर्स पोस्टर्सचे प्रदर्शन
जैन हिल्स येथील परिश्रम हॉलच्या तळमजल्यावर संशोधन पोस्टर्स चे प्रदर्शन मांडण्यात आले आहेत. त्यात २० निरनिराळ्या महत्त्वाच्या संत्रा मोसंबी संदर्भात आपले संशोधन पोस्टर्स सादर केलेले आहेत. काही महत्त्वाच्या, लक्षवेधी पोस्टर्सची माहिती प्रदर्शित आहे. त्यात मोसंबीच्या सालीपासून चविष्ट चटणी; अन्न तंत्रज्ञानाचा नवा प्रयोग, नागपूर येथील ICAR-CCRI फार्मवर १० वर्षे जुन्या झाडांवर ११ विविध जातींची चाचणी घेण्यात आली. प्रयोगाच्या निष्कर्षानुसार, ‘साई शरबती’ ही लिंबाची जात कोळी कीडला सर्वात कमी बळी पडणारी असते असे संशोधनात आढळले, त्याचे संशोधन पोस्टर लक्ष्यवेधी ठरले. नारंगी, मोसंबी आदी लिंबूवर्गीय फळांवर प्रक्रियेत शिल्लक राहिलेले साल‑बिया‑गराचा कचरा अन्नउद्योगासाठी महत्त्वाचे पोषक द्रव्य आणि जैव सक्रिय घटक देऊ शकतो, या संकल्पनेवर आधारित संशोधन पोस्टर अभ्यासकांनी मांडले होते.




















