जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२५
तालुक्यातील म्हसावद शिवारात पाय घसरून नाल्याच्या पाण्यात पडल्याने सीताबाई मस्तरिया बारेला (५५, मूळ रा. मध्य प्रदेश, ह. मु जळके, ता. जळगाव) या महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१५ जानेवारी) दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बजारीया येथील रहिवासी असलेल्या सीताबाई बारेला व पती गेल्या तीन वर्षांपूर्वी रोजगारासाठी जळके शिवारात आले आहेत. शेतात मजुरी काम करून बारेला दाम्पत्य उदनिर्वाह करतात. सीताबाई म्हसावद शिवारात कामासाठी गेल्या असताना पाय घसरून त्या नाल्यात पडल्या व त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. ही घटना काही ग्रामस्थांच्या लक्षात आली व त्यांनी घटनेची माहिती महिलेच्या पतीला दिली. महिलेला बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, चार मुले, चार मुली असा परिवार आहे.