जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६
चोपडा तालुक्यातील उमर्टी येथील २८ वर्षीय आदिवासी विवाहित महिलेने तिच्या २ मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, या विवाहितेने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नसले तरी कौटुंबिक वादातून घटना घडली असल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील उमर्टी येथील सासर असलेली पमिता डोंगरसिंग पावरा (वय २८), अडीच वर्षांचा विरेन आणि १५ दिवसांचे बाळ अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. पमिता पावरा ही या दोघा मुलांसह कालपासून बेपत्ता होती. बुधवारी सकाळी ११ वाजता स्वतःच्याच विहिरीत त्या तिघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री या तिघांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, ही विवाहिता काही दिवसांपूर्वीच प्रसूत झाली होती. त्यामुळे ती माहेरी आली होती. त्या काळात मोठा मुलगा विरेन हा त्याच्या वडिलांकडे होता. तर, दोन ते तीन दिवसांपूर्वीच ही विवाहिता आपल्या पतीसोबत सासरी आली होती. या महिलेने असे टोकाचे पाऊल का उचलले.
हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांकडून त्याच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पारिवारिक कलहातून महिलेने २ लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असावी. तर महिला काही दिवसांपूर्वीच बाळंतीण झाली होती, त्यामुळे अजून काही दिवस तिला आराम करण्यासाठी राहू द्यावे, असे सांगितले होते. मात्र, सासरच्या लोकांनी ते ऐकले नसल्याने संतापात टोकाचे पाऊल उचलल्याची गावात चर्चा आहे.




















