जळगाव मिरर | १९ जुलै २०२५
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील ‘सावली’ डान्सबार असल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवली. या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मौन बाळगल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “बाईंना अजूनही त्यांचं काम माहीत नाही? सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारुन सांगणार का?” असा खोचक सवाल खडसे यांनी चाकणकरांना उद्देशून केला.
सोशल मीडियावर व्यक्त होताना खडसे यांनी म्हटलं, “राज्यातील डान्सबार, बारबाला आणि मंत्र्यांचा त्यात असलेला कथित संबंध यावर पत्रकार प्रश्न विचारतात, पण चाकणकर उखाणा घ्यायला सांगितल्यासारखं नकार देतात. महिला आयोगाशी संबंधित या गंभीर मुद्द्यावर त्यांचं मौन संशयास्पद आहे.” खडसे यांनी 2024-25 मध्ये 18 वर्षांखालील 4,096 मुली आणि 33,599 महिलांच्या बेपत्ता होण्याच्या आकडेवारीवरही प्रश्न उपस्थित केले. “महिला आयोग यावर काय पावलं उचलत आहे? धोरण आहे का, की सगळं प्रदेशाध्यक्षांना विचारायचं?” असा टोला त्यांनी लगावला.
अनिल परब यांनी विधानसभेत सांगितलं की, कांदिवलीच्या सावली डान्सबारवर पोलिसांनी धाड टाकली असता 22 बारबाला, 22 ग्राहक आणि 4 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं. हा बार ज्योती कदम यांच्या नावे असल्याचा दावा त्यांनी केला. डान्सबारवर बंदी असतानाही हा प्रकार कसा सुरू आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण केला आहे.
