जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२४
महापालिकेकडून सागरपार्क मैदानावर खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने केंद्र शासनाने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला आहे. त्यामुळे खान्देश महोत्सव रद्द करण्यात आल्यामुळे तेथे स्टॉल लावण्यासाठी आलेल्या बचत गटांच्या महिलांनी मनपा प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला. त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या पदार्थ्यांची विक्री करता येणार नसल्यामुळे मनपाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मनपा प्रशासनाने सदर महिलांना तेथे स्टॉल लावून विक्री करण्यास सहमती दर्शवली मात्र, ग्राहक येणार नसल्यामुळे त्या बचत गटांचे खाद्यपदार्थ बेघर निवारासाठी खरेदी करण्यात आल्याने बचत गटांचे होणारे नुकसान टाळता आले.
शहर महानगरपालिका जळगाव अंतर्गत महिला व बालकल्याण विभागामार्फत खान्देश महोत्सव २०२४ चे आयोजन दि. २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सागर पार्क बॅरिस्टर निकम चौक जळगाव या ठिकाणी खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. यात जिल्हाभरातील बचत गटांचे खाद्यपदार्थांसह इतर वस्तुंचे स्टॉल लावण्यात येणार होते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम देखील या दरम्यान होणार होते. परंतु भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाल्याने केंद्र शासनाने दि. २६ ते १ जानेवारी पर्यंत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला आहे. त्या कारणास्तव दि.२७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणारा खान्देश महोत्सव जळगाव मनपा प्रशासनाकडून स्थगित करण्यात आला. त्यामुळे गुरुवारी स्टॉल लावण्यासाठी सागर पार्कवर आलेल्या महिलांची महोत्सव रद्द झाल्यामुळे मोठी फसगत झाली. काही बचत गटांनी खाद्यपदार्थ तयार करून आणले होते तर, काही महिलांनी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य तयार करून आणलेले होते.
परंतु स्टॉल लावता न आल्याने व ते पदार्थ विक्री करता येणार नसल्याचे समजल्यावर त्या महिलांचा संताप झाला असून महापालिका प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी महिलांकडून करण्यात आली होती. त्यामुळे मनपाच्या महिला व बाल कल्याण विभागाने महिलांकडील खाद्यपदार्थ विक्रीसाठी मदत केली तसेच काही खाद्यपदार्थ बेघर निवारा केंद्रातील लोकांसाठी खरेदी करून बचत गटांच्या महिलांचे होणारे नुकसान टाळले.
