जळगाव मिरर | १३ मार्च २०२५
छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारले गेले आहे. भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा या ठिकाणी उभारलेल्या या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. आता तिथीनुसार शिवजयंती 17 मार्च रोजी येत आहे. या दिनी या मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या मंदिरातील शिवाजी महाराजांची मूर्ती अयोध्या येथील रामलल्लाची मूर्ती घडविणारे मूर्तीकार अरुण योगी यांनी बनवली आहे.
शिवाजी महाराजांची मूर्ती सहा फूट अखंड कृष्णशीला पाषाणातून घडविण्यात आली आहे. मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर शिल्प चित्र साकारण्यात आले आहे. त्याखाली त्या प्रसंगाची माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये देण्यात आली आहे. हे मंदिर शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ बनणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, स्वामी गोविंदगिरी महाराज, काडसिद्धेश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या मंदिराचा भव्यदिव्य लोकपर्ण सोहळा पार पडणार आहे. सात वर्षे सुरू असलेल्या काम पूर्णत्वास आले आहे.येथील सर्व वातावरण शिवमय झाले आहे.संपूर्ण तालुका व जिल्ह्यात या मंदिराची चर्चा सुरू झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून या मंदिराबाबत विचारणा होत आहे. शिवाजी राजांमुळे आपल्या हिंदूंची मंदिर वाचली त्या राजांचे एक मंदिर व्हावे अशी आमची भावना होती. ज्या राजांमुळे आपला शमीन हिंदुस्थान अखंड राहिला. आदिलशहा निजामशहा यांची आक्रमणे होत असताना आपले राजे त्यांच्या विरोधात उभे ठाकले ते लढले नसते तर आज परिस्थिती वेगळी असती.त्यामुळे आम्ही हे मंदिर उभारले आहे, असे शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ही अयोध्या येथील राम मंदिरातील रामलल्लांची मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगीराज या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मुर्तीकाराने घडवली आहे. अखंड कृष्णशिला या दगडातून सहा फूट उंचीची बनवली आहे. अरुण योगीराज यांनी घडवलेली ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिलीच मूर्ती आहे. चार वर्षांपूर्वी ती बनण्यास त्यांनी सुरुवात केली होती. मध्यंतरी रामलल्ला यांच्या मूर्तीच्या कामामुळे त्यामध्ये खंड पडला होता. ही मूर्ती बनवताना अरुण योगीराज यांनी विविध पैलूंचा अभ्यास करून या मूर्तीला जिवंत केले आहे.शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शौर्याचे प्रसंग त्यांचा इतिहास समाजाला कळावा यासाठी तटबंदी खालील जागेत 36 शिल्पचित्र बनवण्यात आले आहेत. त्याची माहिती मराठी इंग्रजी भाषेमध्ये दिली आहे.