
जळगाव मिरर | ८ जून २०२५
पुण्यातील अभियंता समाधान बालू पाटील या अविवाहित तरुणाने ७ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील बाळद येथील पाच पुल शिवारातील झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, या घटनेबाबत कुटुंबीय अनभिज्ञ असून यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बाळद येथील समाधान बालू पाटील हा तरुण पुण्याला फिनोलेक्स कंपनीमध्ये अभियंता या पदावर नोकरी करत होता. त्याने पुण्याहून परस्पर येऊन बाळदच्या पाच पुल शिवारातील स्वतःच्या शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. याची कुठलीही कल्पना कुटुंबीयांना नव्हती. असे या तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले, याची सर्व माहिती अजून गुलदस्त्यात आहे. या घटनेनंतर पंचनामा करून समाधान पाटील यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस प्रशासनामार्फत केला जाणार आहे. दरम्यान, मयत समाधान पाटील यांच्या पश्चात आई-वडील, एक मोठा भाऊ असा परिवार आहे. अचानक घडलेला हा प्रकार पाहून त्यांनी मोठा आक्रोश केला. अतिशय गरीब परिस्थितीतून शिकून समाधान हा नोकरीला लागलेला होता. तो घराला पुढे नेईल, अशी आशा कुटुंबीयांना असतानाच तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली.