
जळगाव मिरर | १० एप्रिल २०२५
रस्त्याने पायी जात असतांना खांबावरुन तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने लागलेल्या विजेच्या धक्क्याने योगेश रघुनाथ डोंगर (वय २१, रा. गवळीवाडा, तांबापुर) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा भागातील गवळी वाडा परिसरात योगेश हा आपल्या कुटुंबीयासह वास्तव्याला होता. बांधकामाचे काम करून तो कुटुंबियांना हातभार लावित होता. शहरातील चौगुले प्लॉट जवळील लेंडी नाल्या जवळून जात असताना रेल्वे लाईनचा कच्चा रस्त्यावर असलेल्या एमएसईबीच्या खांब्यावरील तुटलेल्या तारेला त्याचा स्पर्श झाला. यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने योगेशचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहे. विजेचा शॉक लागून योगेश डोंगर या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन लहान बहिणी असा परिवार आहे. योगेश हा वडीलांना संसाराचा गाडा चालविण्यास हातभार लावित होता. त्यावर दुर्देवी काळाने झडप घातल्यामुळे आईवडीलांचा आधार गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.