
जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२६
जामनेर तालुक्यातील पहूर येथील मंदिराच्या पायरीवर मित्रांसोबत बसलेल्या तरुणाला अचानक चक्कर येऊन तो खाली कोसळल्याने डोक्याला गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पहूर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हितेश अरुण पवार (वय १९, रा. पहूर कसबे) हा तरुण गावातील हनुमान मंदिराच्या पायरीवर मित्रांसोबत बसला होता. त्यावेळी अचानक त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. पडताना त्याच्या डोक्याला जबर मार लागला. घटनेनंतर त्याला तत्काळ गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
हितेश हा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी होता. शालेय जीवनातच त्याला पियानो वादनाची विशेष आवड होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तो पियानोच्या माध्यमातून राष्ट्रगीत सादर करत असे. सध्या तो अजिंठा येथील बाबुरावजी काळे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.
मित्रपरिवारात मिसळणारा, हसतमुख आणि कलावंत वृत्तीचा हितेश वडिलांच्या ‘मोहित बँड’ समूहातही सक्रिय होता. त्याच्या अकाली निधनाने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण व आजोबा असा मोठा परिवार आहे. सकाळी नऊ वाजता वैकुंठधाम स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी पारंपरिक विधी पार पडताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.





















