
जळगाव मिरर । ८ नोव्हेबर २०२२
राज्याच्या काना कोपऱ्यातून विद्यार्थी पुण्यात येत असतात, या ठिकाणी मोठ मोठे स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारे क्लासेस आहेत. त्यामुळे पालक सुद्धा विद्यार्थीना या ठिकाणी अभ्यासासाठी पाठवत असतात पण काही विद्यार्थी याचा भलताच फायदा घेवून पालकांच्या स्वप्नावर पाणी फिरवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पीडित तरुणीने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या फिर्यादीनंतर रुपेश राजाभाऊ व्हावळे (वय ३५, रा. परळी वैजनाथ) नामक तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश आणि पीडित तरुणी दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आले होते. या दोघांची ओळख अभ्यासिकेत झाली. ओळखीचे रुपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. आरोपी रुपेशने विवाहाचे आमिष दाखवत तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने लग्नाला साफ नकार दिला तसेच पीडित तरुणीला बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर रुपेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत.