जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२६
किरकोळ वादातून सासुरवाडी येथे राहण्यासाठी गेलेल्या सागर दिलीप बिऱ्हाडे (वय ३६) याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना दि. २२ रोजी जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातील जुना मारुती मंदिर परिसरात घडली. या घटनेमुळे गावात खळबळ माजून गेली असून पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील राजमालती नगरात राहणारा सागर बिऱ्हाडे हा तरुण गेल्या सात वर्षांपासून आव्हाणे येथे सासूरवाडीला राहण्यासाठी गेला होता. पत्नी व चार मुलांसह तो वास्तव्यास होता. गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावातील जुना मारुती मंदिर परिसरात सागर बिऱ्हाडे याचे गावातील तरुणासोबत भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, या मारहाणीत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जमिनीवर कोसळला आणि जागेवरच सागरचा दुर्देवी मृत्यू झाला.
सागरला मारहाण केल्यानंतर तो जमिनीवर कोसळल्याने संशयित मारेकरीत तेथून पसार झाले दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सागरला बेशुद्ध अवस्थेत पाहून गावातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. गावातील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मयत सागरच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जळगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. खूनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे.




















