जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२३
राज्यभरात अनेक तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या केल्या असून आत्महत्या करणाऱ्यांपैकी दोन तरुणांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून १० लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर करण्यात आली होती. सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना चेकही देण्यात आले. मात्र, हे चेक बाउन्स झाले आहेत. तहसीलदारांची सही न जुळल्यामुळे हे चेक बाउन्स झाल्याची माहिती आहे.
सरकार आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची अवहेलना करत असल्याचा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. तर सरकारने आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची अवहेलना थांबवावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील सुनील बाबुराव कावळे (वय ४०) यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्यापाठोपाठ २६ ऑक्टोबर रोजी गणेश काकासाहेब कुबेर यांनी देखील आरक्षणासाठी आपतगाव येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी दोन तरुणांनी आत्महत्या केल्यानंतर समाज आक्रमक झाला. या घटनेनंतर संतप्त तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.
दोन्ही मृत तरुणांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या आणि मयताच्या वारसाला शासकीय नोकरी द्या, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यावेळी गावकऱ्यांनी घेतली होती. दरम्यान, सरकारने दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली. मदतीचे १० लाख रुपयांचे चेक तहसीलदारांची सही न जुळल्याने बाउन्स झाले. मात्र, याविषयी आंदोलकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मात्र आरटीजीएसद्वारे (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) रक्कम वितरित करण्यात आली. तर, एका कुटुंबाला अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही