जळगाव :प्रतिनिधी
भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व अमृता इंड्स्ट्रीज आयोजित तीन दिवसीय परिवर्तन जळगाव संस्थेच्या ‘परिवर्तन कला महोत्सवा’ची सुरवात १ एप्रिल शुक्रवारी महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या अमृता प्रीतम यांच्यावरील ‘अमृता साहिर इमरोज’ या महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या नाटकाच्या प्रयोगाने होणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात परिवर्तन जळगावचा ‘कला महोत्सव’ हा उत्तम आणि महत्वाचा समजला जातो.
खान्देशातील संस्कृती, भाषा, कविता, संगीत आणि नाटक यांचा समावेश असलेला असा तीन दिवसीय महोत्सव प्रथमच कोल्हापूरात आयोजित होत आहे. दि. १ ते ३ एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध नाट्यकर्मी शरद भुताडिया यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनात होणार आहे. याप्रसंगी रंगकर्मी प्रिती जोशी, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्यावरील परिवर्तन जळगाव निर्मित ‘अमृता साहिर इमरोज’ नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. शंभू पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शीत या नाटकात जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर, शंभू पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अतिशय वेगळ्याप्रकारचे हे नाटक असून राज्यातील अनेक ठिकाणी या नाटकाचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. हा संपूर्ण महोत्सव रसिकांसाठी खुला असून तीनही दिवसाची कार्यक्रमाची वेळ सायं.६:३० वाजेची आहे.
या महोत्सवाच्या यशस्वीतेशाठी कोल्हापूर शहरातील वाचक, नाट्यकर्मींची, रसिक प्रेक्षकांची मदत होत आहे. त्यात प्रामुख्याने अक्षरदालन पुस्तकालय, गायन समाज देवल क्लब, अ.भा.ना. परिषद कोल्हापूर शाखा, सुगुन नाट्यसंस्था, अभिरूची नाट्यसंस्था, प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्र, राज्य नाट्य स्पर्धा समन्वयक प्रशांत जोशी, राज्य मराठी नाट्य व्यवस्थापक आणि नाट्यमित्र संघ, विरासत नाट्यसंस्था, फिनिक्स, यशोधरा, परिवर्तन कला फाउंडेशन, ओंकार स्टेज सर्व्हिसेस, मेरिड इंडिया , राणी अहिल्याबाई वाचन मंदिर सेनापती कापशी, छ. शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, संस्कार बहुदेशिय सामजिक संस्था भुएवाडी, श्री हनुमान तरुण मंडळ काळंम्मावाडी, श्री जयोस्तुते मित्रा मंडळ कोल्हापूर, श्री तुकाराम माळी तालीम मंडळ, प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांचे सहकार्य लाभत आहे.
कोरोनानंतरच्या काळात राज्यनाट्य स्पर्धेनंतर कोल्हापूर बाहेरील संस्थेचा असा तीन दिवसीय महोत्सव प्रथमच होत असून या महोत्सवाला रसिकांनी उत्स्फुर्त दाद द्यावी असे आवाहन आयोजक अमृता इंड्स्ट्रीजचे इंद्रजीत दळवी, दिलीप सावंत, अनिल पाटकर, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचे हिमांशू स्मार्त यांनी केले आहे.
