दापोली: उन्हाळ्यामध्ये पिकनिकसाठी जाण्याचे ठरवीत आहे. तर महाराष्ट्रामधील स्वर्गात जायचे असे तर ते आहे कोकण याठिकाणी भरपूर बीच तुम्हाला पहायला मिळतील तसेच मांसाहारीसाठी कोकण हे खास ठरणार आहे. कोकणात मांसाहारी असलेली मासळी हि तुम्हाला विविध रूपात खायला मिळणार त्यामुळे तुम्ही या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली पाहिजे.
अथांग निळाशार समुद्र, नारळ-पोफळीच्या झाडी, हिरव्यागार वनराईचा नजारा अनुभवायचा असेल तर दापोलीतल्या मुरुड समुद्रकिनारी नक्कीच भेट द्या. दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यातलं शहर. दापोलीला कोकणचं ‘मिनी महाबळेश्वर’ही म्हटलं जातं. थंडगार हवा, दाट झाडी, शहरी भागात टुमदार इमारती तर गावांमध्ये कौलारू घरं असा काहीसा नजारा इथे पाहायला मिळतो. याच दापोलीत मुरुड हे एक छोटंसं गाव आहे. या गावाला अथांग असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. सुमारे अडीच किमी लांबीचा हा समुद्रकिनारा पर्यटकांना मोहून टाकतो. स्वच्छ निखळ आणि फेसाळलेळा समुद्र, रुपेरी-चंदेरी वाळू, लाटांबरोबर वाहून येणारे शंख शिंपळे, खेळती हवा आणि इथला सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते.
मुंबईपासून दापोली 215 किलोमीटरवर आहे. मुंबईतून रेल्वेने जायचं असेल तर खेडला उतरावं लागतं. जेमतेम 6-7 तास तरी एक्स्प्रेसनं प्रवास करण्यामध्ये जातात. खेडवरून दापोलीला एसटी किंवा खासगी गाड्यांनी जाता येतं. एसटीनं जायचं झाल्यास तासभर तरी जातो आणि बाईक असेल तर 35 मिनिटं लागतात. त्यानंतर दापोलीतून मुरुड समुद्रकिनारी जाण्यासाठी अर्धा तास तरी जातो. कार किंवा बाईक नसेल तर रिक्षा या ठिकाणी उपलब्ध असतात. मुंबईतून बाईक किंवा कारनं दापोलीत जायचं असेल तरी 6 तास प्रवासात जातात.
वॉटर रायडिंग, घोडे आणि उंट सवारी
समुद्रकिनारी पोहोचताच प्रवासाचा सर्व थकवा मात्र निघून जातो. शेजारीच पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेलही आहेत. जेवणासाठी छोटे छोटे रेस्टॉरंटही आहेत. लहान व्यापाऱ्यांनीसुद्धा इथे आपला व्यवसाय थाटलाय. सी फूडबरोबरच शाकाहारी अन्नही इथल्या रेस्टॉरंटमध्ये पर्यटकांना मिळू शकतं. दुपारी 4 नंतर पर्यटकांची वर्दळ या समुद्रकिनारी पाहायला मिळते. वॉटर राइडिंगचा रोमांचकारी अनुभवदेखील इथे घेता येतो. घोडे, उंट सवारीदेखील याठिकाणी उपलब्ध आहे. कॅम्पिंग तसंच मासेमारीसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
इतिहास, संस्कृतीचा अनोखा संगम
समुद्रकिनारा ही तर या गावाची शान आहेच. पण या गावाची दुसरी शान म्हणजे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे. मुरुड हे कर्वे यांचं गाव. तसंच किनाऱ्याजवळच दुर्गादेवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचं छत पिरॅमिडच्या आकाराचं आहे. त्यामुळे इथे फक्त निसर्गच नाही तर इतिहास आणि संस्कृतीचाही अनोखा संगम पाहायला मिळतो.