मुबंई : वृत्तसंस्था
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वावटळीचा पुढचा अंक सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भावनिक शब्दांत व्यथा मांडली असताना दुसरीकडे आता त्यांनी एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी नाट्याला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची अट एकनाथ शिंदेंनी घातल्यानंतर आज खुद्द उद्धव ठाकरेंनीच फेसबुक लाईव्हमध्ये देखील शिवसैनिकच मुख्यमंत्री झाला तर आनंदच आहे, अशी भूमिका मांडली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार दोलायमान अवस्थेत आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्याला ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे भाजपाकडून यावर सावध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. गटनेते पदावरून देखील एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर शिंदे शिवसेनेतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या ऑफरमुळे गणितं बदलण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपद आणि शिवसेनापक्ष प्रमुख पद सोडू
मी आव्हानाला सामोरा जाणारा माणूस आहे. हे जसं मी मख्यमंत्रिपदासाठी बोलतोय तसं शिवसैनिकांसाठी बोलतोय. काही जण बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं शिवसैनिकांना वाटत असल्यास त्या शिवसैनिकांनी सांगावं की दोन्ही पदं सोडायला तयार आहे. मला ते आनंदानं सांगा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको हे समोर येऊन सांगा. शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्रिपद सोडावं तर देखील मी सोडेन.
जोपर्यंत मी खुर्ची अडवून ठेवली आहे तोर्यंत काहीच होणार नाही. एकदा या, फोनवरुन सांगा, फेसबुक लाईव्ह पाहिलं, चॅनेलच्या माध्यमातून पाहिलं. आम्हाला तिकडं यायला संकोच वाटतो. तुम्ही आम्हाला नको आहात हे सांगा मी पदं सोडायला तयार आहे हे सांगा.
राज्यातील जनतेला उद्धव ठाकरेंना आवाहन
बांधवांनो आणि भगिनींनी एकच सांगेन, पदं येत असतात पदं जात असतात. आयुष्याची कमाई पदं नसतात. पदावर बसल्यानंतर तुम्ही अडीच वर्षामध्ये आपली भेट झाली. उद्धव जी तुम्ही फेसबूक लाईव्हवरुन बोलत होतो त्यावेळी तुम्ही कुटुंबातले सदस्य असल्यासारखं सांगता. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. मुख्यमंत्रिपद आयुष्याची कमाई नाही. मुख्यमंत्रिपद अनपेक्षितपणे आलं. हे माझं अजिबात नाटक नाही. संख्या किती कुणाकडे आहे हा विषय गौण आहे. लोकशाहीत संख्या अधिक कुणाकडे असते तो जिंकतो. ती संख्या कशी जमवता प्रेमाने जमवता, जोर जबरदस्तीनं जमवता त्यानंतर अविश्वास ठराव मंजूर होतो. माझ्यावर अविश्वास ठराव दाखवण्याी वेळ येऊ नये. मी माझं मन घट्ट करुन बसलेलो आहे. मुख्यमंत्रिपदी राहायची अजिबात इच्छा नाही. माझ्या विरुद्ध एकानं अविश्वास व्यक्त केला तर त्यानं मला वैयक्तिक सांगावं, तुम्ही मला सांगा, मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. मी तुम्हाला भेटेन त्यावेळी माझ्यावर इतकच प्रेम करत राहा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
