मुंबई : वृत्तसंस्था
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याचं ते म्हणत आहेत. कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही, असा शब्द भाजपने आपल्याला दिल्याचं एकनाथ शिंदे सांगत आहेत. आपण फक्त एकजुटीने राहू. विजय आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. भाजप एक राष्ट्रीय शक्ती आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे. आपल्याला मदतीचा त्यांनी शब्द दिलाय. तुमच्या पाठीमागे आमची पूर्ण शक्ती असल्याचं भाजप नेतृत्वाने आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे आता आणण एकजूट राहण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना मार्गदर्शन म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी परतीचे दोर कापले
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी माघारी यावं आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत विचार करु, असं म्हटलं होतं. संजय राऊत यांनी ट्विटवरुन देखील आवाहन केलं होतं. आता एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ समोर आल्यानं राजकीय चित्र स्पष्ट झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी परतीचे दोर कापले आहेत, असंच प्रथमदर्शनी म्हणावं लागेल.
संजय राऊत यांनी काय आवाहन केलं होतं?
चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत.. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!
भाजप आता थेट सक्रिय होणार का?
एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आज मेघालयचे मुख्यमंत्री पोहोचले होते. भाजप आमदार संजय कुटे आणि मोहित कंबोज सूरतपासून सोबत आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदार थांबलेल्या सूरत आणि गुवाहाटी ही दोन शहरं भाजपशासीत राज्यातील असल्यानं भाजप आता थेट सक्रिय होऊन ठाकरे सरकार पाडण्यासाठी सक्रिय होणार का हे पाहावं लागणार आहे.




















