औरंगाबाद : वृत्तसंस्था
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी होणारी औरंगाबाद येथील सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीनं दिला आहे. या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घालून दिल्या आहेत जर या अटींच उल्लंघन झाल्यास घोषणा देऊन सभा बंद पाडू असा इशारा संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे. संपूर्ण राज्यातून भीम आर्मीचे कार्यकर्ते सभेसाठी औरंगाबादला जाणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली आहे.
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली आहे. योग्य ठिकाणी दाद मागा, असं खडसावत याचिकाकर्त्यांना कोर्टानं 1 लाखाचा दंड ठोठावलाय. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका केली होती. परवानगी दिली तरी सभा लाईव्ह दाखवू नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला पोलिसांनी काही अटी आणि शर्तींसह गुरुवारी परवानगी दिली. सांस्कृतिक मैदानावर मनसेकडून सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. तर पोलिसांचा ही मोठा फौजफाटा या सभेसाठी तैनात असणार आहे. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अनेक पक्षांनी विरोध केला होता. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नये म्हणून अनेक नेत्यांनी पोलिसांकडे मागणी केली होती. पण गुरुवारी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली आहे. सभेसाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरु आहे.