जळगाव : प्रतिनिधी
आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सातवीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत प्रदान करण्यात आली आणि सातवीच्या विद्यार्थ्यांकडून आठवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. असा हा ज्ञानज्योत आदानप्रदान समारंभ वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
जळगाव तालुक्यातील कंडारी जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते आठवी आहे. या शाळेत गावासह परिसरातील विद्यार्थी प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतात. तब्बल आठ वर्ष या शाळेत शिकल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी परगावी जातात. बालपणीची ही आठ वर्षे गावातच निसर्गरम्य वातावरणात शिक्षण घेत पार पडत असल्याने आनंददायी शिक्षण घेता येते. त्यानुसार पहिली ते आठवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवीतून निरोप घेतला. हा निरोप देताना इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना भावपूर्ण निरोप देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच गेल्या आठ वर्षांपासून ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी ही ज्ञानज्योत पुढेही कायम सुरू राहावी यासाठी सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रदान केली. त्यानंतर सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत केले. यावेळी मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी, विनोद जयकर, गणेश तांबे, डॉ. जगदीश पाटील, मंजुषा पाठक, सविता निंभोरे, सुनंदा रोझतकर, ज्योती वाघ, साधना सुर्यराव यांची उपस्थिती होती.