कुऱ्हा काकोडा : प्रतिनिधी
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेची सात दिवशीय विशेष श्रम संस्कार हिवाळी शिबीर बोदवड ता.मुक्ताईनगर येथे संपन्न झाले. समारोप प्रसंगी प.पु.माधव सदाशिव गोळ्वलकर गुरुजी सार्व.संस्था कुऱ्हा काकोडा संस्थेचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष जेष्ठ संचालक प्रल्हादजी बढे, प्रभाकर सुशीर, कमलाकरजी तायडे, प्राचार्य डॉ.सुरेश वराडे, कार्यक्रम अधिकारी हेमराज मेतकर तसेच महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शितल म्हस्के, मनोज वाघ, गोकुळ खिरोळकर, रा.से.यो. संचालक डॉ.सचिन नांद्रे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
शिबिरा दरम्यान कोरोना लसीकरण जनजागृती,ग्राम स्वच्छता, व्यसन जनजागृती, अवयवदान जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बेटी बचाव बेटी पढाओ, अंधश्रद्धा निर्मुलन, वृक्ष रोपणाकरिता खड्डे, जातिमुक्त भारत, सांस्कृतिक कार्यक्रम, शौचालय निर्मिती उपक्रम राबविले. ग्रामस्वच्छता , वृक्षरोपनासाठी खड्डे खोदणे, प्रभात फेरी द्वारे घरोघरी जावून जनजागृती केली.
