मुंबई : आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला आहे. मुंबई इंडियन्स मुक्कामी असलेल्या हॉटेलवर सचिन तेंडुलकर पोहोचल्याचा व्हिडिओ फ्रँचायझीने शेअर केला आहे. सचिनच्या या व्हिडिओला मुंबई इंडियन्सने ‘आला रे’ असे कॅप्शन लिहिले आहे. सचिन तेंडुलकर आयपीएलच्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सचा भाग आहे. २००८ ते २०१३ या कालावधीत खेळाडू म्हणून संघाशी निगडीत राहिल्यानंतर सचिन आता मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहे.
या व्हिडिओशिवाय मुंबई इंडियन्सने सचिनचा ५ आयपीएल ट्रॉफींसोबतचा फोटोही शेअर केला आहे. मुंबई इंडियन्सने २०१३ मध्ये पहिले विजेतेपद पटकावले होते. यानंतर संघाने २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्येही विजेतेपद पटकावले आहे.
मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे, तर हा संघ २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल २०२२ मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. आयपीएल मेगा लिलावामुळे या संघात काही बदल झालेले दिसतील. संघाने लिलावापूर्वी रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांना कायम ठेवले होते. लिलावापूर्वी हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सने करारबद्ध करत त्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले, तर कृणाल पंड्याला लखनऊ सुपर जायंट्सने विकत घेतले आहे.




















