
जळगाव : नाशिक जिल्ह्यासह गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत गिरणा धरणात ९१.८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले आहेत. २ हजार ४७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात येत असल्याने गिरणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशरा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणात सुमारे ९२ टक्के जलसाठा झाला आहे. जुलै महिन्यातच धरण ९२ टक्के भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. धरणातून सुरवातीला २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यानंतर आज शनिवारी दुपारी धरणाचे वक्रद्वार क्रमांक १ व ६ प्रत्येकी १ फुटाने उघडण्यात आले आहे. त्याद्वारे नदीपात्रात एकूण २ हजार ४७६ क्यूसेक्स पाण्याच्या विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे.
मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात कुठलीही मनुष्यहानी झालेली नाही. एका म्हैस दगावली आहे. ३ घरांची पूर्णत: पडझड तर ६ घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.




















