
जळगाव : प्रतिनिधी
शहरात एकाच आठवड्यात दुसरा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील हरी नगरातील एका तरुणाचा चाकूने खून करण्यात आला आहे. दरम्यान काही मिनिटात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशियताला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहिती अशी की, हरीविठ्ठल नगरात रात्री ८ वाजेच्या सुमारास बाजार पट्ट्या भागात दिनेश काशिनाथ भोई (वय २८, हरी विठ्ठल नगर) या तरुणाच्या डोक्यावर वार करण्यात आला आहे तर त्याला रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा एका तासात मृत्यू झाला. हा खून पूर्ववैमनस्यतून झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दिनेश काशिनाथ भोई (वय २८, हरी विठ्ठल नगर) हा रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर बसलेला होता. त्यावेळी अचानक विठ्ठल नामक संशयित व्यक्तीने मागून येत दिनेशच्या डोक्यात कोयत्याने जोरदार वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी व नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. मयत दिनेश भोई हा सेंट्रींग काम करीत होता. त्याच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे किरण कुमार व बकाले यांच्या मार्गदनाखाली पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले आहे. या पथकात प्रीतम पाटील, अक्रम शेख, विजय पाटील यांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
दोन दिवसापूर्वीच गेंदालाल मिल येथील तरुणाचा खून झाला होता तसेच शुक्रवारी नाल्यामध्ये तरुणाचा मृतदेह मिळून आला. त्याचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या दोन्ही घटना ताज्या असताना आता शनिवारी रात्री ९ वाजता हरी विठ्ठल नगर मध्ये खून झाल्याचे दिसून आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनेची माहिती घेत होते.




















