जळगाव ः प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या होत असलेल्या औरंगाबाद येथील सभेसाठी जय्यत तयारी सुरु असतांना आज सकाळी शहरातील एमआयडीसी पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 149 प्रमाणे नोटीसी बजाविण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, उद्या औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शहरातील एमआयडीसी पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटीस बजावलेली आहे.
नोटीसीमध्ये म्हटले आहे की, दि.3 मे रोजी मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजान सण तसेच हिंदु बांधवांचा अक्षय तृतीया तसेच परशुराम जयंती आहे. तसेच भोंगे संदर्भात विविध बातम्या प्रसारित होत आहेत. त्याअनुषंगाने दोन समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही समाजकंटक याच संधीचा फायदा घेवून गंभीर स्वरुपाचा जातीय दंगलीसारखा गुन्हा करून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्याची शक्यता बळावलेली आहे. तरी आपण मनसे या महत्वाच्या पक्षाचे शहरअध्यक्ष व सदस्य आहेत. सदर काळात आपल्या कार्यकर्त्यांकडून समाजविघातक कृत्य करून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा आशयाची ही नोटीस दि.30 रोजी महानगराध्यक्ष किरण तळेले, कुणाल पाटील, संदिप मांडोळे, कुणाल पवार यांना देण्यात आली आहे.
