मनवेल ता.यावल : प्रतिनिधी
जळगाव-औरंगाबाद-अहमदनगर-पुणे-मुळशी-दिघी पोर्ट या राष्ट्रीय महामार्गाचे नॉर्थ एंड जळगाव शहर न करता किनगाव ता.यावल जि. जळगाव करून जळगाव वरून किनगाव पर्यंत हा NH 753 F महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे कार्यकर्ते डॉ .सुनिल पाटील यांनी केंद्रीय रस्ते, महामार्गविकास मंत्री मा.नितीन गडकरी यांना दिले.
सध्या NH 753 F जळगाव -औरंगाबाद-अहमदनगर-पुणे-मुळशी-दिघी पोर्ट या राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण काम चालू आहे. या महामार्गाचे North End जळगाव शहर असून त्याऐवजी किनगाव ता.यावल या मोठी बाजारपेठ असलेल्या अंकलेश्वर -बऱ्हाणपूर NH 753 B या महामार्गावरील गावास North End करून किनगाव ते ईदगाव मार्गे जळगाव हे २२ किमी अंतर सुद्धा चौपदरीकरण करण्यात यावे. असे केल्यास NH753 B (अंकलेश्वर -बऱ्हाणपूर) व NH753 F ( जळगाव ते दिघी) हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना जुळतील. या माध्यमातून महामार्ग जोड प्रकल्पाचा चांगला प्रयोग आपल्या कल्पक, विकासाभिमुख, दुरदर्शी नेतृत्वाखाली राबविला जाईल व जळगाव जिल्ह्यातील जनतेला विशेष करून यावल तालुक्यातील जनतेला दळणवळण साठी व आंतर राज्य संपर्कात वाढ होण्यासाठी, रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी, पर्यटनाला चालना मिळणेसाठी, कृषी व आरोग्य क्षेत्रासाठी खूप फायदेशीर ठरेल. याच किनगाव गावाजवळ आडगाव गावात सातपुडा पर्वतात खान्देशातील खूप लोकांचे कुलस्वामिनी मनुदेवींचे खूप जागृत देवस्थान असून खान्देशातील चांगले पर्यटन स्थळ देखील आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, खा.उन्मेष पाटील उपस्थित होते. चांगला मुद्दा असून सर्वे व डीपीआर साठी ठेवू असे सूचक आश्वासन मा.नितीन गडकरी यांनी दिले.