
जळगाव :, प्रतिनिधी
“जळगाव हे राजकीय गाव आहे अशी ओळख मी येथे येण्यापूर्वी होती. मात्र गेल्या अडीच वर्षांत जळगाव शहरातील लोकसहभागाचे अनेक उपक्रम मी अनुभवले. यामुळे जळगाव हे दानशुरांचे गाव आहे, हे सांगायला मी सर्वांत पुढे असेन” अशा शब्दांत जळगावकरांचा गौरव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केला.
नगरसेवक नितीन बरडे, स्व. शिवचंद्रजी (गणूशेट) जाखेटे आणि त्यांचा मित्र परिवार यांच्याकडून जानकीराम आनंदराम बाहेती शाळेतील आणि समतानगर परिसरातील १ हजारावर विद्यार्थी-विद्यार्थिनींना दप्तर, वह्या वाटपाचा कार्यक्रम आज श्री. राऊत यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमासाठी रोटरी हॉलमध्ये मुला-मुलींची व पालकांची तुडूंब गर्दी झालेली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बरडे यांनी केले. “गेल्या १२ वर्षांपूर्वी स्व. गणूशेट यांनी पुढाकार घेऊन सुरू करायला लावलेला हा उपक्रम जाखेटे परिवार व इतर दानशूर मित्रांनी सुरू ठेवला आहे. शालेय साहित्य मिळालेले विद्यार्थी समाजातील शेवटच्या घटकातील आहेत. त्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला आनंद देतो. हे कार्य अविरत सुरू राहिल,” असे ते म्हणाले. “या उपक्रमासाठी प्रकाशशेट जाखेट, अशोकभाऊ जैन, सुनीलभाऊ मंत्री, सुरज झंवर, अशुतोष पाटील यांचेही सहकार्य असते,” असाही उल्लेख श्री. बरडे यांनी केला.
यावेळी दिलीप तिवारी यांनीही विचार मांडले. ते म्हणाले, ‘एकीकडे उंचावर संपन्न जैन हिल्स आहे. दुसरीकडे तेवढ्याच उंचीवर समतानगर आहे. जैनहिल्सवरील दातृत्व समतानगरातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचते. जळगाव शहर जाखेटे, जैन, बाफना अशा दानशुरांचे शहर आहे. याचा जळगावकरांना अभिमान आहे.”
श्री. राऊत यांनीही उत्स्फूर्तपणे मुला-मुलींशी संवाद साधला. ते म्हणाले, “जळगाव दानशुरांचे आहे हे मी यापुढे सांगेन. शहरात शैक्षणिक वातावरण तयार करण्यासाठी असे विधायक उपक्रम हवेत. दप्तर म्हणजे केवळ वह्या-पुस्तकांची जागा नाही. ते मुलांचे भवितव्य घडविणारे एक विश्व आहे. शहरात दप्तराविना कोणी राहू नये हा विचार जळगावकरांनी कृतीत आणला हे उत्तम आहे. याबरोबरच पालकांचीही जबाबदारी आहे. त्यांनीही मुला-मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी पाल्यांना शिकवावे. सरकारी वा सामाजिक संस्थांच्या चांगल्या योजनांचा लाभ घ्यावा. पालकांनीही मुला-मुलींच्या अभ्यासात लक्ष घालावे.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाट्यकर्मी हर्षल पाटील यांनी केले. यावेळी व्यासपिठावर कन्हय्याशेट संताणी, रामेश्वर जाखेटे, संजय शहा, श्याम कोगटा, ॲड. रोहन बाहेती होते. परिचय मुख्याध्यापक पी. आर. जाधव यांनी करून दिला. कार्यक्रमानंतर दप्तर, वह्या व चॉकलेट घेऊन बाहेर पडणाऱ्या मुला-मुलींचे पालकांचे चेहरे प्रसन्न व आनःदी होते.




















