मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन हिची 4.40 कोटी रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील गोरेगाव भागातील व्यावसायिकाने रिमीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पैशांची गुंतवणूक केल्यावर तिमाही 30 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र हे पैसे व्यावसायिकाने परत न दिल्याचा दावा रिमीने केला आहे. या प्रकरणी रिमी सेनच्या तक्रारीवरून खार पोलीस ठाण्यात व्यावसायिकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोनक जतीन व्यास विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
रिमीने ‘हंगामा’ या कॉमेडी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर धूम, गोलमाल, दिवाने हुआ पागल, गरम मसाला, बागबान, क्योंकी, फिर हेराफेरी, यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एकेकाळी आपल्या चित्रपटांमुळे हिट ठरलेली रिमी आज काहीशी विस्मृतीत गेली आहे.
काय आहे प्रकरण?
तीन वर्षांपूर्वी अंधेरीतील एका जिममध्ये गोरेगावचा रहिवासी असलेला आरोपी रोनक जतीन याच्याशी रिमीची भेट झाली. काही महिन्यांतच दोघांची मैत्री झाली.
जतिनने बिझनेसमन असल्याचे सांगून एलईडी लाईटची नवीन कंपनी उघडली होती. त्यानंतर त्याने रिमीला या कंपनीत 30 टक्के परताव्यावर गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. तिने पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी कराराचा ड्राफ्ट तयार केला.
गुंतवणुकीची डेडलाई संपल्यावर रिमीने त्याच्याकडे नफा मागितला, पण जतिन तिच्या कॉलकडे दुर्लक्ष करू लागला. त्यानंतर जतीनने असा कोणताही व्यवसाय सुरू केला नसल्याचे तिला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.