औरंगाबाद : वृत्तसंस्था
शहरातील पुंडलीकनगर गल्ली क्रमांक 4 मध्ये एका मंदिरासमोरील इमारतीत ही घटना घडली. येथे राहणाऱ्या कलंत्री दाम्पत्याची हत्या करण्यात आलीय. शामसुंदर हिरालाल कलंत्री आणि किरण शामसुंदर कलंत्री असे हत्या करण्यात आलेल्या जोडप्याचे नाव आहे.
कलंत्री यांच्या घरातून दुर्गंध येत होता. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी पोलिसांना त्या दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ हे मृतदेह घरात पडून होते. तसेच, हे दोन्ही मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवण्यात आले होते.
या जोडप्याची गळा कापून हत्या करण्यात आली असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ही हत्या नेमकी कधी झाली याचे गूढ कायम असून नातेवाईकांनीच त्यांची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. अत्यंत नियोजनपूर्वक हा खून केल्याचं दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
