ममुराबाद येथील १३ वर्षीय मुलाचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रणव पाटील (वय १३) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे लग्न घरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ममुराबाद येथील मुकूंदा पाटील हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. मुकूंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्याने घरात लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. रविवारी १७ एप्रिल रोजी मुकूंदा पाटील आणि त्यांची पत्नी दिपाली पाटील हे दोघेजण भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रणव हा घरी एकटाच होता. सकाळी ८ वाजेच्या सुमारास बाथरूममध्ये बादलीत हिटर लावले होते. त्यानंतर बाजूलाच प्रणव आंघोळ करण्यासाठी बसला. अचानक त्याला विद्यूत हिटरचा धक्का लागल्याने प्रणवचा जागीच मृत्यू झाला.




















