
मुबंई : वृत्तसंस्था
दि.८ रोजी रविवारी दुपारी एकच्या सुमारास भरधाव रेल्वेत एका २० वर्षीय तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. संबंधित तरुणी स्वराज एक्स्प्रेसमधील वॉशरूम कोचमध्ये गेली होती. पण बराच काळ उलटूनही ती परत आली नाही. या प्रकारानंतर आसपासच्या प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी संबंधित कोचचा दरवाजा उघडला असता, २० वर्षीय तरुणी लटकलेल्या अवस्थेत आढळली आहे.
Maharashtra | At around 1235 hrs, some info was received regarding 12471 Swaraj Express. A special halt was given at Dahanu Road RS at 1310 hrs after passengers informed that a 20-yr-old girl went inside the washroom & did not come out for a long time: Western Railway CPRO (1/2)
— ANI (@ANI) May 8, 2022
तिच्या गळ्याभोवती एक कपडा गुंडाळलेला होता. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर रेल्वेत एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास डहाणू रोड आरएस येथे स्वराज एक्स्प्रेस रेल्वेला विशेष थांबा देण्यात आला आणि याठिकाणी तरुणीचा मृतदेह उतरवण्यात आला, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली.
धक्कादायक बाब म्हणजे संबंधित तरुणीसोबत एक व्यक्ती आणि लहान मुलगा बोरीवलीपासून सोबत प्रवास करत होते. पण ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यापासून दोघंही फरार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. धावत्या रेल्वेत हा धक्कादायक प्रकार घडल्याने प्रवशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.