
जळगाव : प्रतिनिधी
पातोंडा- गडखांब गावाजवळ रविवारी दुपारी बसने दुचाकीला धडक दिल्याने गुगळवाळ (ता. मालेगाव) येथील तरुण प्रीतेश संजय निकम (वय २३) याचा जागीच मृत्यू झाला.
प्रीतेश हा पातोंडा येथे आपल्या बहिणीला भेटायला दुचाकीवर येत होता. गडखांब गावाजवळ इगतपुरी आगाराच्या चोपडा – नाशिक बसने (एमएच १४, बीटी ३६२९) पुढील बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला (एमएच ४१, सी ४१३५) जोरदार धडक दिली. यात प्रीतेश निकम हा जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील यांनी घटनास्थळी जात पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
प्रीतेश हा पातोंडा येथील भूषण एकनाथ बिरारी यांचा शालक असून, तो बहिणीला भेटायला येत असतानाच पातोंडा अवघे सहा किलोमीटर असतानाच काळाने घाला घातला. प्रीतेशच्या वडिलांचे मागील वर्षी अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने आई व दोन बहिणींचा तो एकुलता एक आधार होता. गतवर्षी नवापूरजवळ झालेल्या अपघातात प्रीतेशच्या कुटुंबातील सहा सदस्य मृत झाले होते. आता पूर्ण कुटुंबात तो एकटा पुरूष सदस्य होता.




















