मुंबईः राज्यात बी ए.५ आणि बी ए. ४ या प्रकारांचे आणखी २३ रुग्ण आढळले असून, कस्तुरबा रुग्णालयाच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार, यात मुंबईतील बीए ५ प्रकारांचे १७; तर बीए ४ प्रकाराचे सहा रुग्ण आढळले आहे. कस्तुरबा प्रयोगशाळेने एकूण ३६४ नमुन्यांचे परीक्षण केले असून, त्यापैकी एक नमुना वगळता सर्व नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन हाच विषाणू आढळून आल्याचे राज्याच्या आरोग्यविभागाने सांगितले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ३६४पैकी ३२५ नमुन्यांमध्ये बीए २ आणि बीए २.३८ हे प्रकार सर्वाधिक प्रमाणात आढळून आले आहेत. हे सर्व नमुने १ ते १८ जून या कालावधीतील आहेत. या २३ रुग्णांमध्ये ० ते १८ वर्षांतील १, १९ ते २५ वर्षांतील २, २६ ते ५० वर्षांतील ९ तर ५० वर्षापेक्षा अधिक असलेल्या रुग्णांची संख्या ११ आहे. यात ११ पुरुषांचा व १२ स्त्रियांचा समावेश आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. यापैकी पुण्यात १५, मुंबईत २८, नागपूर येथे ४; तर ठाण्यात दोन रुग्ण आढळले आहेत.




















