मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. आतापर्यंत शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या तब्बल ३८ आमदारांसह सहा अपक्ष आमदार गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. शिंदेंचा हा गट भाजपला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. आणि अशातच सत्तेच्या या खेळात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट उतरल्याची बातमी `टीव्ही-९` मराठीने दिली आहे.
या वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र भाजपने यास फारसा प्रतिसाद दिला नसल्याचेही यात म्हटले आहे. असे असेल तर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा पेच असू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये भाजपला स्वतःहून पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व कमी झाले होते. तसेच भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयामुळे झाल्याचा दावा नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी होऊ शकते.
दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. २४ तासांत परत या. तुमची जर मागणी असेल तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार असल्याची घोषणा त्यांनी केली. संजय राऊतांनी ही घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमची विरोधात बसण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील चर्चेच्या बातम्या येत आहेत. राजकारणात काहीही घडू शकते. त्यामुळे सध्या राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते, हे सांगता येत नाही.




















