लखनौ : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमध्ये आज भाजपच्या योगी आदित्यानाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. भाजपनं योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिलं. तर, मंत्रिमंडळ स्थापन करताना उत्तर प्रदेशचं जातीय गणित देखील बॅलन्स करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजपनं त्यांचा मूळ मतदार ठाकूर आणि ब्राह्मण समुदायासह भूमिहार,ओबीसी आणि एससी समुदायातील आमदारांना मंत्रिपद दिलं आहे. योगींच्या मंत्रिमंडळात 21 सवर्ण, 20 ओबीसी आणि एससी समुदायातील 9 मंत्र्यांचा समावेश आहे. योगी आदित्यानाथांशिवाय मंत्रिमंडळात 18 कॅबिनेट, 14 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 20 राज्यमंत्री यांना राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शपथ दिली. मुस्लीम आणि शीख समुदायातील प्रत्येकी एका एका सदस्याला मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.
योगी आदित्यनाथ यांची कॅबिनेट
योगी आदित्यनाथ यांच्या 2.0 मंत्रिमंडळात योगींसह 21 जण सवर्ण, 20 ओबीसी आणि एससी समुदायातील 9 जणांना मंत्री बनवण्यात आलंय. तर, यादव समाजाला देखील प्रतिनिधित्त्व देण्यात आलंय. सवर्ण समाजाच्या 21 मंत्र्यांमध्ये 7 ब्राह्मण, 8 ठाकूर यांच्याशिवाय दोन भूमिहार आणि एका कायस्थ समाजाच्या आमदाराला मंत्रिपद देण्यात आलंय, तर ठाकूर समाजाला देण्यात आलेल्या 8 मंत्रिपदामध्ये 2 कॅबिनेट, 3 स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि तीन जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आलंय. ब्राह्मण समाजाला 3 कॅबिनेट, एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री, 3 राज्यमंत्री अशी संधी देण्यात आलीय. यामध्ये उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांचा समावेश आहे. तर, जितीन प्रसाद आणि योगेंद्र उपाध्याय यांचा समावेश आहे. योगी आदित्यानाथ यांनी वैश्य समाजााच्या तीन आमदारांना मंत्रिपद,कायस्थ समुदायाला 1 तर भूमिहार समुदायाच्या 2 आमदारांना मंत्रिपद दिलंय.
20 मंत्रिपद ओबीसी समाजाला
योगी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये ओबीसीच्या 20 आमदारांना मंत्री बनवण्यात आलं आहे. यामध्ये भाजपचे मित्र पक्ष अपना दल आणि निषाद पार्टीच्या एका आमदाराला संधी देण्यात आलीय. तर, त्यांना एक एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय. तर, भाजपचा ओबीसी चेहरा केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव होऊन देखील उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. तर, याशिवाय ओबीसींच्या इतर आठ आमदारांना मंत्री करण्यात आलंय. कुर्मी समाजाचे स्वतंत्र देव सिंह, राकेश सचान आणि अपना दलातून आशीष पटेल यांना मंत्रिपद मिळालंय. तर, जाट समुदायतून लक्ष्मी नारायण चौधरी आणि भूपेंद्र सिंह चौधरी यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय, याशिवाय राजभर समाजातून अनिल राजभर आणि निषाद पार्टीचे संजय निषाद आणि लोध समुदायतील धर्मपाल सिंह मंत्री बनले आहेत.
9 मंत्री एससी समाजाचे
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये एससी प्रवर्गाच्या 9 आमदारांना मंत्रिपद देण्यात आलंय. बेबीरानी मौर्य यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. त्या जाटव समजाच्या असून बसपा प्रमुख मायावतींना पर्याय म्हणून भाजप त्यांच्याकडे पाहतंय. असीम अरुण यांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रिपद देण्यात आलंय, तर गुलाब देवी यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आलंय.