मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात खूप मोठी कलाटणी मिळण्याची चिन्हे आता दिसू लागली आहे. विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बंडखोर आमदारांशी संवाद साधला आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात बंड पुकारले आहे. या बंडाशी भाजपचा कोणताही संबंध नाही, असे भाजपचे नेते वारंवार सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून भाजपने अत्यंत सावध आणि शांत अशी भूमिका घेतली आहे. या सर्व घडामोडीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मौन बाळगून आहेत; पण आता फडणवीस यांनी बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गुवाहाटीतील आमदारांना विश्वास दिला. तसेच शनिवारी रात्री जवळपास १५ आमदार फडणवीस यांच्याशी बोलले असल्याचीही माहिती समोर आली आहे. आज फडणवीस पुन्हा दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. फडणवीस यांची चौथ्यांदा दिल्लीवारी आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात केली असून सकाळीच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राजभवनावर कोश्यारी दाखल झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
