जळगाव ः प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे महत्वाचे नेते मानले जाणारे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी महत्वपूर्ण राजकीय हालचाली सुरु झाल्या होत्या. तर ज्यादिवशी एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठले त्या दिवशी 12 ते 17 आमदार त्यांच्यासोबत होते. मात्र दुसऱ्या दिवशी या आमदारांची संख्या वाढत असल्याने शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकार व्हेटिंलेटरवर आले होते.
यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळून विधान परिषद निवडणूकीत विजयी झालेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सर्व राजकीय घडामोंडीवर प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथराव खडसे यांनी महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय भूकंपावर फारसे बोलणे टाळले पण आम्ही वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी दिली. एकनाथराव खडसे यांच्या विजयाचा जल्लोष म्हणून त्यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. मात्र सद्यपरिस्थितील राजकीय घडामोडींमुळे समर्थक तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तापले आहे. तब्बल तीन वर्षानंतर खडसेंना आमदारकी मिळाली आहे, त्याचा मोठा आनंद कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र राजकीय भूकंपामुळे चिंतेचे वातावरण महाविकास आघाडीत पसरलेले आहे.




















