मुंबई : वृत्तसंस्था
बंडखोरी केलेले आमदार गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय झाला आहे कि, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी एकमुखी मागणी या बंडखोर आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गुवाहाटीत झालेल्या बंडखोरांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे. मात्र, आता बंडोखोरांचा गट कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे.
एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता मिळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही. हा सगळा गोंधळ सुरू असताना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा, अशी मागणी बंडखोरांकडून करण्यात आली आहे. तसेच आमदारांच्या अपात्र करण्याच्या नोटिसा उपाध्यक्षांकडून मिळालेल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी उत्तर कसे देणार, हा प्रश्न बंडखोर आमदारांपुढे आहे. उत्तर सोमवारपर्यंत दिले नाही तर अपात्र होण्याचा धोका आहे. त्यामुळे याविरोधात हाय कोर्टात जाण्याचे ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, आज पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेदेखील आता गुवाहाटी येथे काही वेळातच पोहचणार आहेत. ते एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी दुपारी सुरतहून गुवाहाटीला रवाना झाले. विशेष म्हणजे उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीलादेखील उपस्थित होते. त्यानंतर आता ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होणारे उदय सामंत हे महाराष्ट्रातील आठवे मंत्री आहेत.