मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेनेचे जेष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीनंतर बंड पुकारला. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या ३५ आमदारांसोबत बंड पुकारला असून शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. सकाळपासूनच सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक पार पडली.
वर्षा बंगल्यावरील बैठकीनंतर शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची हाकालपट्टी करण्यात आली असून एकनाथ शिंदेंच्या जागी अजय चौधरींची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय हालचालींना वेग आला असताना सुरतमधून सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे.
एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसोबत सुरतमधील ले मेरेडियन हॉटेल येथे आहेत. तर एकनाथ शिंदे संध्याकाळी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर सुत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा एकनाथ शिंदेसोबत चर्चा करू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार का, अशा चर्चाही आता रंगत आहेत.




















