यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील बोरावल खुर्द गावाजवळ भरधाव रिक्षावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना दुपारी घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, बोरावल बुद्रुक येथील रहिवासी विनोद भिका सपकाळे हा ॲपेरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्याकडे (एमएच १९ व्ही १४६३) क्रमांकाची ॲपेरिक्षा आहे. २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विनोद सपकाळे हा रिक्षा घेवून यावलकडून बोरावलकडे येत असताना कैलास पोपट धनगर रा. विरावली यांच्या शेताजवळ त्याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होवून अपघात झाला.
या अपघातात विनोद सपकाळे हा जागीच ठार झाला. त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यासंदर्भात मयताचा भाऊ आनंद सपकाळे यांच्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजमल पठाण हे करीत आहे.