चाळीसगाव : प्रतिनिधी
वटसावित्री पौर्णिमेच्या आध्यात्मिक सणासोबत पर्यावरणाचा जागर करण्याचा संकल्प गेल्या तेरा वर्षापासून केलेला असुन आम्ही पूजेला जमलेल्या साऱ्या भगिनींना रोपांची भेट देऊन पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली आहे. आज सलग १३ वर्ष हा उपक्रम सुरू असून ग्लोबल वॉर्मिगचे संकट असताना येत्या काळात आध्यात्म आणि पर्यावरण याची वैज्ञानिक सांगड ही काळाची गरज असल्याची भावना उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. संपदाताई पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज वटसावित्री पोर्णीमेच्या निमित्ताने गेल्या 13 वर्षापासून उमंग महिला परिवाराच्या वतीने पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही उमंगच्या संस्थापिका संपदाताई पाटील, अध्यक्षा साधनाताई पाटील, रत्नप्रभा नेरकर ,सारिका जैन, कविता पाटील, कल्पना पाखले यांच्या तर्फे पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेऊन व रोपांची भेट देऊन पर्यावरण जागर करण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.