यावल : प्रतिनिधी
चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त करून नेत असतांना ट्रॅक्टर मालकाने तलाठ्याला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेल्याची धक्कादायक घटना दोणगाव ते डांभूर्णी दरम्यान घडली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील दोणगाव ते डांभूर्णी दरम्यानच्या रस्त्यावरून बुधवार १५ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरटी वाहतूक करत असतांना ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ बीजे ४५३८) तलाठी निलेश जानकीराम धांडे यांनी अडविले. वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता ट्रॅक्टर चालक गोलू खूशाल बाविस्कर रा. पुनगाव ता. चोपडा याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तलाठी यांनी ट्रॅक्टर वाहन जप्त करून यावल तहसील कार्यालयात नेत असतांना चिंचोली येथील हायस्कूल जवळ ट्रॅक्टर मालक सचिन राजेंद्र बाविस्कर हा दुचाकीने डबलसिट येवून ट्रक्टरवरून तलाठी निलेश धांडे यांना धक्काबुक्की करून खाली उतरविले आणि धमकी दिली. याप्रकरणी तलाठी निलेश धांडे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक गोलू खूशाल बाविस्कर, सचिन राजेंद्र बाविस्कर आणि एक अनोळखी मोटारसायकल स्वार यांच्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.