भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील २७ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींनी दुचाकी घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पतीसह सासरच्या मंडळींविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगरातील माहेर असलेल्या नेहा जाहीर तडवी (वय-२७) यांचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यात जहिर अहमद तडवी यांच्याशी २०२१ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. दरम्यान लग्नाच्या दोन ते तीन महिन्यानंतर विवाहितेला स्वयंपाक येत नाही, असे बोलून तिचा अपमान करणे सुरू केले. त्याचप्रमाणे दुचाकी घेण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये आणावे, या कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करणे, मारहाण करणे सुरू झाले. त्याच बरोबर सासू-सासरे, नणंद, लहान दीर यांनीदेखील पैसे आणण्यासाठी कागदावर टोमणे मारणे सुरू केले. या छळाला कंटाळून विवाहिता भुसावळ येथे माहेरी निघून आल्या. त्यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात पती जहिर अहमद तडवी, सासू हनिफाबी अहमद तडवी, सासरे अहमद कबीर तडवी, ननंद तबस्सुम अहमद तडवी, दीर इस्माईल उर्फ शेरू अहमद तडवी, जफर अहमद तडवी सर्व रा. घाटनांद्रा सिल्लोड जि.औरंगाबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर करीत आहे.