पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या पिंप्री प्र.भ. येथील वृद्ध महिलेची भरदिवसा घरात घुसून धारदार विळ्याने हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. अज्ञात मारेकऱ्या विरुद्ध पाचोरा पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पिंप्री प्र. भ. ता. पाचोरा येथील तेजसबाई पूना जाधव (वय – ८०) हे मृत महिलेच नाव असून दि. ३१ मे रोजी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. मयत वृद्धेच्या गळ्यावर विळ्याने दोन वार करण्यात आले आहेत. तेजसबाई पुना जाधव यांना दोन मुले आहेत ते बाहेरगावी नोकरीस असून त्या एकट्याच राहत होत्या.
भरवस्तीत असलेल्या या घरात ही घटना घडून गेल्यानंतर दि. ३१ मे रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास मृत्यूची घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे यांच्यासह नगरदेवळा दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील, कैलास पाटील, विनोद पाटील, नरेंद्र शिंदे, मनोहर पाटील घटनास्थळी तत्काळ हजर झाले होते. आज सकाळी दि. १ जून रोजी फोरेन्सिक पथक, श्वान पथक व ठसा तज्ञ घटनास्थळी हजर होऊन त्यांनी सर्व प्रकारचे नमुने तपासणीसाठी घेतले असून सदरील घटना ही हत्या आहे की आत्महत्या ? अशा चर्चेला गावात उधान आले होते. मृत महिलेचा भाचा भागवत बळीराम कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात भा. द. वी. कलम ४५२, ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मयत तेजसबाई जाधव यांचेवर दि. १ जुन रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.