मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्तासंघर्षावरुन राज्यातील कायदा – सु्व्यवस्था बिघडली तर राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतील अशी चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल असं मला वाटत नाही. पण राष्ट्रपती राजवट लागली तर मग मध्यावधी निवडणुका होतील.’ असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
राज्यात सध्या सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. राष्ट्रवादी सोबत फारकत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची शिंदे गटाची मागणी आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास शिवसेनेचे 40 आणि अपक्ष 10 आमदार असल्याने त्यांची बाजू ही मजबूत होताना दिसत आहे.
राज्यातील हा सत्तासंघर्ष कोर्टात जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेने 16 बंडखोर आमदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.
शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं त्यांनी याआधी ही म्हटलं आहे. दुसरीकडे शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. तर बंडखोरांच्या समर्थनात देखील मोर्चे निघत आहेत. राज्यातील हा सत्तासंघर्ष पाहता राष्ट्रपती राजवट लागू होणार का? अशी चर्चा आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली तर शिंदे गट किंवा भाजप काय भूमिका घेणार याकडे ही सर्वांचं लक्ष लागून आहे.