जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शाहू नगरातील एका तरूणावर काहीही कारण नसतांना तीन जणांनी तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, शाहू नगरातील इम्रानखान मुस्ताकखान (वय-३३) हा आपल्या आईवडील, भाऊ व पत्नी यांच्यासह वास्तव्याला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी माहेरी गेंदालाल मिल येथे राहण्यासाठी गेलेली आहे. रविवार ३ जुलै रोजी पत्नीला भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी येत असतांना बिग बाझार समोरील बाजूच्या शाहू नगर रोडकडून जात असतांना रस्त्यावर सुमित पोळ, गोट्या निंबाळकर, गोल्या रणसिंगे (तिघांचे पुर्ण नाव गाव माहित नाही) हे समोर आले. तिघांनी इम्रानची दुचाकी अडविली.
काहीही कारण नसतांना सुमित पोळ याने हातातील तलवार काढून इम्रानच्या डोक्यात टाकली. त्यात तो गंभीर जखमी झाला. मित्राच्या मदतीने इम्रानला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सोमवारी ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता इम्रानने दिलेल्या जबाबावरून संशयित आरोपी सुमित पोळ, गोट्या निंबाळकर, गोल्या रणसिंगे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.




















